४/०७/२०२०

10.माणसे

      10.माणसे

आजन्म भोगल्यावरही का छळतात माणसे?
आयुष्याची सोबत तरी किती कळतात माणसे?

शिशीरातल्या पानगळीसारखी गळतात माणसे
रंगण्याआधीच चित्रातून ही पळतात माणसे

संसाराचं तेच दळण पुन्हा दळतात माणसे
अप्रिय त्याच वळणावर पुन्हा वळतात माणसे

वचनांपासुन सुद्धा सहज ढळतात माणसे
वणव्यासारखी शापाग्नीत ही जळतात माणसे

अश्रू परपीडेवर अजून गाळतात माणसे
कधी अश्रूत भाग्य आपले क्षाळतात माणसे

विवेकशून्य चाळणीतुन सत्य चाळतात माणसे
सावलीस देखील स्वतःच्या टाळतात माणसे

ग्रीष्मातल्या उन्हात कधी पोळतात माणसे
शरणागत लव्हाळ्यासम लोळतात माणसे

संगमावर गंगेच्या जेव्हा मिळतात माणसे
मृत्यूस आवंढ्या सारखी गिळतात माणसे




9.उपकार संकटांचे

   9.उपकार संकटांचे

जरी मारिले मारिले संकटांनी
खरे सांगतो तारिले संकटांनी

तिमिरात जेव्हा दिशा लुप्त झाल्या
तेंव्हा मला शोधिले संकटांनी

हे दारिद्रय मी ज्यात ओलीस होतो
पैशात मज तोलिले संकटांनी

बहू भाग्य माझे अती सोसले मी
मला पोसले पोसिले संकटांनी

किती फाटली फाटली कातडी ही
परि आतडे राखिले संकटांनी

उडाया मिळाले हे आकाश सारे
की आधारही कापिले संकटांनी

जसे बाण आले उरी खोचले मी
रुधीरास या रोधिले संकटांनी

व्यथा वेदनांची चव्हाट्यात व्याली
तया झाकिले झाकिले संकटांनी

8.जगण्याचे शाप

      8.जगण्याचे शाप 


जीवनाला शाप जगण्याचे छळाया लागले
चंद्र मावळताच तारेही पळाया लागले

काजळाच्या ज्या कट्यारी काळजावर चालल्या
तेच हे जे वार सारे भळभळाया लागले

बघ पुन्हा अंधार पदराला नव्याने झोंबला
कुंकवाचे तेज जे सारे ढळाया लागले

खूप झाली भाषणे अन् खूप झाल्या घोषणा
योजनांचे गुप्त हेतुही कळाया लागले

फेडण्या उपकार माझे हार मजला घातले
साप का मग ते गळ्याला आवळाया लागले

ओढले आसूड ज्यांना या जीभेने झोडले
तेच सारे शब्द आता कळवळाया लागले

पावसाचा रास-गरबा होळीलाही चालला
शेत पाण्याने पुराच्या ही जळाया लागले

चाललो नेमस्त मी नाकासमोर नेटका
मार्ग हे घाटातले मग का वळाया लागले

संयमाचे चांदणे ज्यांच्या छतावर सांडले
सांगना आवसान त्यांचे का गळाया लागले

पाप जे पेटीत दानाच्या धुवाया टाकले
हात देवाचे कसे बघ ते मळाया लागले

7.दूर माझा गाव

     7.दूर माझा गाव

दूर माझा गाव ,दूर माझा गाव
दूर माझा गाव,माझ्या काळजाचा ठाव
जात्यावर ओवीत गाते माय माझे नाव

सावली ग्रीष्मात मांडी कवडशांचा डावरे
बरसूदे पाऊस वारा घे शिरावर घावरे
रक्षिण्याला गाव स्वतःला गाव घेईल धाव
दूर माझा गाव.......

डोंगराच्या पायथ्याशी शेत माझं रांगतं
पीत पाणी पीक माझं त्या नभाला सांगतं
दे धन्या आभाळमाया झड सुखाची लाव
दूर माझा गाव........

नांगराचा फाळ उठवी ढेकळांच्या पंगती
चांदणे पेरीत मोती प्रेम माया संगती
तीच ममता पोषिते मग रंक आणिक राव
दूर माझा गाव.........

पंख फुटता जी उडाली दूर गेली पाखरे
परतुनी येतील दारी माऊलीची आसरे
आसवांच्या सागरातील ने तीरावर नाव
दूर माझा गाव.........

एकदा येऊन जारे गाव हा पाहून जा
पाहुण्या गावात माझ्या एकदा राहून जा
बघ तुला भावेल इथला भाव भोळा भाव
दूर माझा गाव.........

6.काळ्या मातीचं गाणं

     6.काळ्या मातीचं गाणं

पिठुरल्या पुनवेत फुलारलं शेत,
मायेचं आभाळ कवेत घेत
दाण्या दाण्याचे करित मोती,
माझ्या शेतात काळी माती  llधृll

लवलवते सुगीची नार
तिला सोसेना ज्वानीचा भार
उडे पदर पिसाट वारं
डूलं खुशीत सारं शिवार
जिवा-शिवाची जोडीते नाती,
माझ्या शेतात काळी माती  ll१ll

माझ्या खळ्यात माझा घास
जोडी खिलारी माझी खास
माझ्या मळ्यात धानी सुवास
पान-तळ्यात संजीवन हास
पक्षी सुरात भलरी गाती,
माझ्या शेतात काळी माती  ll२ll

5.माझा माळशेज घाट

5.माझा माळशेज घाट

माझा माळशेज घाट
घाट नागमोडी वाट
वाटंवर मन घाटांतून....सळसळतंय

माझा माळशेज घाट
घाटमाथ्याचा ललाट
ललाटावरून पाणी कसं.... खळखळतंय

माझा माळशेज घाट
घाट डोंगराची लाट
लाट लाटेवर कसं भय....डुचमळतंय

माझा माळशेज घाट
घाटामधी धुकं दाट
दाटलेल्या धुक्यामधी सुख....घुटमळतंय

माझा माळशेज घाट
घाटामधली पहाट
पहाटेच्या धुक्यामधी हीव....विरघळतंय

माझा माळशेज घाट
घाटाचा हा न्यारा
थाटामाटात चांदणं कसं....निरमळतंय

माझा माळशेज घाट
त्यात वारं हे भन्नाट
भनानल्या शिवारात कुणी....तळमळतंय

माझा माळशेज घाट
खोल द-यांचा हा काठ
काठावार असं वाटं जसं....मळमळतंय

माझा माळशेज घाट
रातरीच्या उदरात
थरथरारलं तम कसं....कळवळतंय

माझा माळशेज घाट
वनराई घनदाट
दाट करवंद जाळं कसं....फळफळतंय

माझा माळशेज घाट
घट मेघ डोईवर
वर भरतो घागर शेत....हिरवळतंय

माझा माळशेज घाट
बळीराजाचा मैतर
मैतराचं खळ आनंदून....दरवळतंय

4.महामार्ग आणि पायवाट

4.महामार्ग आणि पायवाट

"हायवे दादा थांब
मला जाऊदे पल्याड !
हात जोडते मी
तुला जाऊदे पल्याड !

आवर तुझा वेग
जरा लावना लगाम !
त्या टेकडीच्या पार
आहे माझे एक काम !"

"काम काम काय काम
थाप हाणतेस !
अडथळा गतीस मम
उगाच आणतेस !

मुक्काम गाठण्यास मी
हा धावतो सुसाट !
वाट रोखतेस तू
भिक्कार पायवाट !"

"विसावा घे जरासा
दमतोस तू पळून !
तव राग काढण्यास
मी येते जरा वळून !

चुकलाय जंगलात
कुणी वाटसरू वाट !
वाट दावते मी इथे
राई घनदाट !

"दिशाहीन पावटी तू
गणती तुझी काय ?
मीही वाट दावतो
नगरांस महाकाय !

वाट दावणे न वाटे
खरे हे निमित्त !
वाटेत आड येऊनी
खवळू नकोस पित्त !

जाळयात या वाटांच्या
चकवा म्हणून छळतो !
बघ मी कसा माझ्या
नाकासमोर पळतो !

"बहिणी आम्ही वेड्या
असंख्य  वळणवाटा !
भेटण्यास येती जशा
किना-यास लाटा !

छोटी जरूर मी रे
खोटी मुळीच नाही !
कुठेही कुणी चुकला
मी धावतेच घाई !"

"चाकांस बांधले मी
अंतर हजार कोस !
नाले कडे कपारी
तू रांगतेस ओस !

भरधाव धावतो मी
भक्कम आणिक ठोस !
 रानात चुकण्याचा तूज्
अस्तित्व शून्य सोस !

झाडे उभी दुतर्फा
मम ढाळतात चौ-या !
खडकावरी कडेला
तव थापतात गौ-या !

मी महान महामार्ग
तू शूद्र पायवाट !
याद राख समूळ तुझा
करीन नायनाट .........!

चुकली चुकून वाट
मुसळधार पावसाची
पोटातली भडास दे
ओकून एकदाची

महामार्ग महापुरात
नदीआड आला
वाहून एक सांधा 
अस्तित्वशून्य झाला

भळभळून जखमा
खळखळून वहात
पळपळून वाटा त्या
मदतीला जात

काटे पाहिले न खड्डे
गाळ,जाळ,ढाळ
लंघून आल्या पावट्या
निवारण्यास काळ

अभिमान गर्व सर्व
गंगेप्रती मिळे
इंगीत जगण्याचे
त्या वेड्यासही कळे

राजपथांशी हे 
महामार्ग बोलती
"माणूसकीची वाट
या वाटाच चालती !"

3.झेप

      3.झेप

जेव्हा माणसाला झाली
उंच उडण्याची घाई
पंख हातांचे हालवी
पाय उदरात घेई

अशा घेतल्या भरा -या
झाला झाला तो पिसाट
चंद्र,सूर्य,ग्रह ,गोल
थरारले गगनात

भिती वाटली तयांना
धरेच्या या माकडाची
दिले बुद्धीचे कोलीत
मती फिरली देवाची

लुकलुक करणारे
सारे थरारले तारे
फुले आकाशाची
खुडून हा भरीलकी हारे

बुध ,गुरू ,शुक्र यांना
आता लागले ग्रहण
मोजमापे नेली त्यानं
आमचं रचिलं सरणं

मागे घाबरला होता
असा रजनीचा कांत
शनी, मंगळही केले
सहजची पादाक्रांत

भवितव्य माणसाचे
ठरवी राशी नक्षत्र
हा नक्षत्रांच्या भाळी
रेखी भविष्य विचित्र

या या पृथ्वीला केली
यानं उघडी बोडकी
लज्जा माणसाची जिने
रक्षियेली होती

लाजे चूरचूर झाली
बावरली सुर्यमाला
म्हणे हात नको लावू
बारे माझ्या पदराला

लाज राख आमची तू
होऊ नको अनावर
कृपा कर झेप
विनाशाची आवर आवर ........

2.सावळवेळ

       2.सावळवेळ

मंद लाटावरी झिंगलं चांदणं
साचलं संथ ताऱ्यासवे
धुंद घाटावरी त्या नदीच्या तीरी
नाचलं मन वाऱ्यासवे

तो लपला द्वाड, ढगांच्या आड
चंद्रमा पुनवेचा,भारी लबाड
त्या प्रीती इशाऱ्यांसवे
धुंद घाटावरी त्या नदीच्या तीरी....

ती मल्हार तान व्याकूळ रान
पल्याड पुष्करणीची कमान
जी फुलली पिसाऱ्यासवे
धुंद घाटावरी त्या नदीच्या तीरी....

ती सावळवेळ,पानांचा खेळ
पांदण वाटेत मनांचा मेळ
दव भिजलं पाऱ्यासवे
धुंद घाटावरी त्या नदीच्या तीरी.... 



४/०६/२०२०

1.सूर्याचे प्रेमगीत

     1.सूर्याचे प्रेमगीत 

कधी कळायचे तुला कसे कळायचे
तू थांबना वसू गडे मला छळायचे          ॥ धृ॥

पाळल्या तुझ्या जरी अशा उरी खुणा
अधिक तू मला आता करू नको उणा
जखमी हृदय सांग किती भळभळायचे
तू थांबना वसू गडे मला छळायचे          ॥१॥


शीत सागराची गे जरी तू स्वामिनी
लाव्हयास दग्ध शरण त्वा दिले मनोमनी
गूज अंतरातले कसे कळायचे
तू थांबना वसू गडे मला छळायचे            ॥२॥

उभ्या कशा अजून पावसात सावल्या
तुझीच वाट पाहता जरा विसावल्या
सांग पाश्चिमेस मी किती ढळायचे
तू थांबना वसू गडे मला छळायचे           ॥३॥

पेटली पुन्हा मनात प्रितीची धुनी
दे हातात हात गेली रात पाहुणी
पाश दुराव्याचे हे कधी खळाायचे
तू थांबना वसू गडे मला छळायचे           ॥४॥

ग्रहणात आपल्यामध्ये शशी असे उभा
चोंबडया उषा निशा नी गडगडया नभा
तू तृप्त खालती मी वरती तळमळायचे
तू थांबना वसू गडे मला छळायचे           ॥५॥

रश्मी करांस जोडतो तुला परोपरी
ग्रहगोल लुब्ध अंतराळी गे तुझ्यावरी
अर्घ्य ओंजळीतुनी किती गळायचे 
तू थांबना वसू गडे मला छळायचे           ॥६॥

नील रंगी शालु बर्फाची काचोळी
पदर धुक्याचा ओढलास तू तरुतळी
सलज्ज हे अधोवदन कधी वळायचे
तू थांबना वसू गडे मला छळायचे           ॥७॥

तू धरा वसुंधरा तू माझी प्रियवरा
विश्वमंडपात शोभू गे वधू वरा
चांदण्यांचे हार हे गळा माळायचे 
तू थांबना वसू गडे मला छळायचे           ॥८॥

मी प्रखर प्रकाश गे तू शीत सावली
मी जाणतो अशक्य हे मिलन असे मुळी
विरहात गे युगे युगे असे जळायचे
तू थांबना वसू गडे मला छळायचे            ॥९॥

विदग्ध काळजातला असाध्य रोग हा
अव्हेर प्रीत ही परी समोर तू रहा
मी अढळ उभा आणिक तू पळायचे
तू थांबना वसू गडे मला छळायचे           ॥१०॥